Translate

संकीर्तन सरिता - ह. भ. प. यशवंत मधुकर पाटील

                                                 अभंग १ 





राम म्हणता रामचि होईजे  ᛁ पदीं बैसोन पदवी घेईजे ᛁ१
ऐसे सुख वचनी आहे ᛁ विश्वासे अनुभव पाहे ᛁ२
रमरसाचिया चवी ᛁ आन रस रुचती केवीं ᛁ३
तुका म्हणे चाखोनि सांगे ᛁ मज अनुभव आहे अंगे ᛁ४

अर्थ : राम म्हटल्यानंतर तुम्ही राम व्हाल . अर्थात हे पद अंतःकरणात बसले पाहिजे असे या वचनात सुख आहे. मात्र याकरिता विश्वासाची गरज आहे. विश्वास ठेवला तर रामरसाच्या पुढे बाकीचे रस रुचत नाहीत . तुकाराम महाराज म्हणतात मी हे चाखले आहेत ,  मला अनुभव आहे म्हणून तुम्हास सांगतो आहे .

सविस्तर चिंतन :  
         
             जिवाने जर रामनाम घेतले तर तो रामच होईल . राम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम आहे . 
१) रामासारखा देव नाही.        
२) रामासारखा राजा नाही. 
३) रामासारखा पुत्र नाही. 
४) रामासारखा पती नाही. 
५) रामासारखा पिता नाही. 
६) रामासारखा बंधू नाही. 
७) रामासारखा मित्र ( सखा ) नाही. 
८) रामासारखा शिष्य नाही. 
९) रामासारखा शत्रू नाही.  

यज्ञ करणे अवघड आहे . दान देणे कठीण आहे . तप करणे सोपे नाही पण राम म्हणणे सर्वात सोपे आहे . 


 

संतवाणी

                                  संतवाणी


 


                         लोकप्रिय अभंग - गीतांचा संग्र



                                               १)ॐनमोजी आद्या 


ॐ नमोजी आद्या ᛁ वेद प्रतिपाद्या ᛁᛁ
जय जय स्वसंवेद्या ᛁ आत्मरुपा ᛁᛁ१ᛁᛁ
देवा तूंचि गणेशु ᛁ सकलमति प्रकाशु ᛁᛁ
म्हणे निवृत्ती दासु ᛁ अवधारिजो जी ᛁᛁ२ᛁᛁ
अकार चरण युगुल ᛁ उकार उदार विशाल ᛁᛁ
मकार महामंडल ᛁ मस्तकाकारें ᛁᛁ३ᛁᛁ
हे तिन्ही एकवटले ᛁ तेथें शब्दब्रह्म कवळलेᛁᛁ
ते मिया श्रीगुरुकृपा नमिलें ᛁ आदिबीज ᛁᛁ४ᛁᛁ
आता अभिनव वाग्विलासिनी ᛁ जे चातुर्यार्थ कलाकामिनी ᛁᛁ
ते श्री शारदा विश्वमोहिनी ᛁ नमिली मियां ᛁᛁ५ᛁᛁ                                                                                                          

                                              २) रुप पाहता लोचनीं
 

रूप पाहतां  लोचनीं ᛁ  सुख  झालें वो साजणी  
तो हा विठ्ठल बरावा  ᛁ तो हा माधव बरवा  
बहुत सुकृतची जोडी ᛁ म्हणुनी विठ्ठलीं आवडी  
सर्वं सुखाचे आगर  ᛁ बाप रखुमादेवीवर  ᛁ 


                                       ३) सुंदर तें ध्यान उभें विटेवरी


सुंदर तें ध्यान उभें विटेवरी ᛁ कर कटावरी ठेवूनियां ᛁᛁ १ᛁᛁ
तुळसीहार गळां कांसे पितांबर ᛁ आवडे निरंतर हेंचि ध्यान ᛁᛁ२ᛁᛁ
मकरकुंडलें तळपती श्रवणी ᛁ कंठी कौस्तुभमणि विराजित ᛁᛁ३ᛁᛁ
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख ᛁ पाहीन श्रीमुख आवडीनें ᛁᛁ४ᛁᛁ


                                     ४) आवडे हें रुप गोजिरें सगुण 


आवडे हें रूप गोजिरें सगुण ᛁ पाहतां लोचन सुखावले ᛁᛁ१ᛁᛁ
आतां दृष्टीपुढें ऐसाचि तूं राहे ᛁ जो मी तुज पाहे वेळोवेळां ᛁᛁ२ᛁᛁ
लांचावले मन लागलीसे गोडी ᛁ तें जीवें न सोडी ऐसें झालें ᛁᛁ३ᛁᛁ
तुका म्हणे आम्ही मागावें लडिवाळी ᛁ पुरवावी आळी मायबापा ᛁᛁ४ᛁᛁ


                                ५) येग येग विठाबाई 


येग येग विठाबाई ᛁ माझे पंढरीचे आई ᛁᛁ१ᛁᛁ
भीमा आणि चंद्रभागा ᛁ तुझ्या चरणीच्या गंगा ᛁᛁ२ᛁᛁ
इतुक्यासहित त्वां बा यांवे ᛁ माझे रंगणी नाचावें ᛁᛁ३ᛁᛁ
माझा रंग तुझे गुणीं ᛁ म्हणे नामयाची जनी ᛁᛁ४ᛁᛁ



                            
                                ६)सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण 


सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ᛁब्रह्म सनातन विठ्ठल हा ᛁᛁ१ᛁᛁ
पतित पावन मानस मोहन ᛁ ब्रह्म सनातन विठ्ठल हा ᛁᛁ२ᛁᛁ
ध्येय ध्याता ध्यान चित्त निरंजन ᛁ ब्रह्म सनातन विठ्ठल हा ᛁᛁ३ᛁᛁ
ज्ञानदेव म्हणे आनंद चिद्धन  ᛁ ब्रह्म सनातन विठ्ठल हा ᛁᛁ४ᛁᛁ


                     ७) योगिया दुर्लभ तो म्या देखीला साजणी 


योगिया दुर्लभ तो म्या  देखीला साजणी ᛁ
पाहतां पाहतां मना न पुरेचि धनी ᛁᛁ१ᛁᛁ
देखिला देखिला गे माये देवांचा देवो ᛁ
फिटला संदेहो निमालें दुजेपण ᛁᛁ२ᛁᛁ
अनंत रूपे अनंत वेषें देखिलें म्यां त्यासी ᛁ
बाप रखुमादेवीवरू खूण बाणली कैसी ᛁᛁ३ᛁᛁ



                               ८)  देवाचिये द्वारी उभा क्षणभरी 


देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ᛁ तेणे मुक्ति चारी साधियेल्या ᛁᛁ
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा ᛁ पुण्याची गणना कोण करी ᛁᛁ
असोनी संसारी जिव्हे वेगु करी ᛁ वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ᛁᛁ
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे ᛁ द्वारकेचा राणा पंडावाघरीं ᛁᛁ



                        ९)  कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता 


कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता ᛁ बहीण बंधू चुलता कृष्ण माझा ᛁᛁ१ᛁᛁ
कृष्ण माझा गुरु कृष्ण माझे तारू ᛁ उतरी पैल पारू भवनदी ᛁᛁ२ᛁᛁ
कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन ᛁ सोईरा सज्जन कृष्ण माझा ᛁᛁ३ᛁᛁ
तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा ᛁ वाटे न करता परता जीवा ᛁᛁ४ᛁᛁ



                    १०) ज्ञानियांचा राजा गुरु महाराव 

 
ज्ञानियांचा राजा गुरु महाराव ᛁ म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसे ᛁᛁ१ᛁᛁ
मज पामरा हें काय थोरपण ᛁ पायींची वहाण पायी बरी ᛁᛁ२ᛁᛁ
ब्रह्मादिक जेथें तुम्हा वोळगणे ᛁ इतर तुळणे काय पुढे ᛁᛁ३ᛁᛁ
तुका म्हणे नेणों युक्तीचिया खोली ᛁ म्हणोनी ठेविली पायीं डोई ᛁᛁ४ᛁᛁ



                                  ११) पंढरीचा वास चंद्रभागे स्नान 
 पंढरीचा वास चंद्रभागे स्नान ᛁ आणिक दर्शन विठोबाचे ᛁᛁ१ᛁᛁ
हेंचि घडो मज जन्मजन्मांतरी ᛁ मागणे श्रीहरी नाही दुजे ᛁᛁ२ᛁᛁ
मुखी नाम सदा संतांचे दर्शन ᛁ जनीं जनार्दन ऐसा भाव ᛁᛁ३ᛁᛁ
नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी ᛁ कीर्तन गजरीं सप्रेमाचे ᛁᛁ४ᛁᛁ

जागतिक संगीत दिन

                          जागतिक संगीत दिन
                  





२१ जून, आज जागतिक संगीत दिन. जगात शांती प्रस्थापित करण्याच्या हेतूने हा दिवस जागतिक पातळीवर संगीत दिन म्हणून साजरा केला जातो. ही पद्धत संगीत विशारद ‘लॉर्ड मेहुदी मेनुहीन’यांनी १९८१ साली सुरु केली होती. भारतीयमध्ये  वैदिक काळापासूनच संगीत कलेला जास्त महत्व आहे. वैदिक काळापासून पंडित देखील चाल लावून ऋचा म्हणत असतं. ऋग्वेदातील कडव्याला 'ऋचा' असे म्हणतात. हिंदू देवांच्या मूर्ती पाहिल्या तर आपल्याला दिसते की, देवांची मूर्ती वाद्य धारण करून असते. संगीताची देवता म्हणून सरस्वतीचे पूजन केले जातं. सामवेदामध्ये  संपूर्ण संगीत कलेबद्दल माहिती दिली आहे. सामवेदात अनेक वाद्यांचा उल्लेख आहे. अश्मयुगीन काळात आदिमानव स्वत:च्या मनोरंजनासाठी संगीत कलेचा वापर करत असे. भरत मुनींच्या नाट्यशास्त्रात देखील  संगीताचा उल्लेख केला आहे. अनेक प्राचीन ग्रंथात संगीत साहित्याचा उल्लेख पाहायला मिळतो. संगीतशास्त्र  प्राचीन असल्याने त्याला आधुनिक काळात देखील फार महत्व आहे. संगीत निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीत आहे. मग पाऊस पडताना आलेला आवाज असो वा पक्ष्यांचा किलबिलाट असो. संपूर्ण निसर्ग हा संगीतमय आहे. प्राचीन काळात अनेक बंदिशी रचल्या गेल्या होत्या. या बंदिशी ऐकायला फार मधुर वाटतं. संगीतात काही घराणी आहेत. यामध्ये ग्वाल्हेर घराणे मुख्य मानले जातात. हस्सू, हद्दू खाँ आणि दादा नत्थन पीरबख्शराजा यांना ग्वाल्हेर घराण्याचे जन्मदाता मानले जातात. मानसिंह तोमर धृपद गायनाचे पितामह म्हणून ओळखले जातात. मानसिंह तोमर  यांनी १४८६ - १५१६ मध्ये 'ग्वालियर स्कूल ऑफ म्युझिक'ची स्थापना केली.  उस्ताद हसू-हद्दू-नाथू खान यांचे ग्वाल्हेर घराण्याच्या वाटचालीत मोठे योगदान आहे. याच परंपरेचे शिष्य म्हणजे बालकृष्ण बुआ इचलकरंजीकर होते. त्यांचे शिष्य पं॰ विष्णू दिगंबर पलुस्कर हे होते. त्यांनी १९०१ मध्ये गांधर्व महाविद्यालची स्थापना करत संगीत क्षेत्रात एक प्रकारची क्रांती घडवून आणली. या व्यतिरिक्त आणखी एक नाव संगीत साहित्य क्षेत्रात मोठे आहे. हे नाव म्हणजे विष्णु नारायण भातखंडे. भातखंडे यांना संगीताचे व्याकरणकार म्हणून ओळखले जाते. यांचे हिंदुस्तानी संगीतसाठी फार मोठे योगदान राहिले आहे.

                                                                                                           स्रोत - whatsapp

पखवाज रचना आणि त्याची वैशिष्ट्ये

              पखवाज रचना आणि त्याची वैशिष्ट्ये 


  • खोड -  शिसम ,चंदन ,नीम ,बाभूळ ,खैर इ. लाकडापासून बनवितात. 
  • आतून पोकळ , दोन्ही बाजूला निमुळता असतो . लांबी सुमारे २३'' ते २५"
  • गोलाकार लहान तोंड सुमारे ६∣∣" व्यासाचे असते . 
  • गोलाकार मोठे तोंड सुमारे ८ ∣" व्यासाचे असते . 
  • वादी -  चामड्याची दोरी ( पट्टी ) 
  • पुडी -  ( पान ) खोडाच्या दोन्ही बाजूला ( तोंडाला ) चामड्याची गोलाकार पुडी तयार करून वादीने तोंडावर घट्ट बसवितात. 
  • गजरा -  अखंड वादीच्या गुंफणेत वर्तुळाकार 'चामडी कडे' तयार केले जाते त्यास गजरा म्हणतात . 
  • घर -  गजऱ्याच्या वरील दोन चामडी पट्टी मधील अंतरास घर म्हणतात . घरे १६ असतात . 
  • शाईपुडी - लहान तोंड , तीन भाग असतात .   
  • चाटस्थान , लवस्थान , मध्यस्थान ( शाई ) 
  • धुमपुडी - मोठे तोंड ( धुम्मा ) , मध्य स्थानावर मध्यभागी शाईऐवजी कणीक लावले जाते . 
  • गठ्ठे - साधारण लांबी ७/८ सें. मी. व जाडी ३ सें. मी. असे भरीव लाकडी ठोकळे आठ( ८ ) असतात.   
  


                                            पखवाज लावणे ( मिळवणे )


पुडीला सोळा घरं असतात. स्वर वाद्यातील इच्छित स्वर कायम करून शाई पुडीवरील त्या घराच्या स्वराशी इतर सर्व घरांचे ( बाजूंचे ) एकीकरण करणे म्हणजे कोणतेही घर ( चाट ) वाजविले असता त्यातून एकच नाद ऐकू येणे याला वाद्य मिळवणे म्हणतात. वाद्य वाजविणाऱ्यास निदान उंचनीच स्वर समजण्याइतके स्वर ज्ञान असावे लागते. नंतर शाईपुडीवरील इच्छित स्वराप्रमाणे धुमपुडीवरील कणीक लावल्यानंतर खालचा खर्ज ( सा ) लागला पाहिजे. दोन्ही  बाजूंचा नाद ( स्वर ) एक असला पाहिजे. ह्याला म्हणतात पखवाज लावणे ( मिळवणे ) . पखवाज उभा ठेवून डावीकडून उजवीकडील घरे सुरांत मिळवण्याचा प्रघात आहे.

 
                      
                     बाज आणि घराणी 

जेव्हा एखादा प्रतिभासंपन्न कलाकार आपल्या पारंपारीक विद्येमध्ये स्वतःच्या कल्पनाशक्तीने चमत्कार घडवून आणून स्वतःची एक खास अशी वेगळी शैली ( गायन , वादन ) निर्माण करतो आणि हि शैली केवळ आपली वंश परंपरा आणि शिष्य परंपरा पर्यंतच मर्यादित राखतो तेव्हा तीच शैली एक विशिष्ट बाज बनते . कालांतराने दुसऱ्या कलाकारांची पद्धती आणि त्या कलाकाराची शैली कलाक्षेत्रात थोड्या अधिक प्रमाणात भिन्नता दर्शवते हि भिन्नता स्पष्ट होत जाऊन तिची वेगळी अशी ओळख कलाक्षेत्रात निर्माण होते. त्या विशिष्ट बाजाचे किंवा शैलीचे घराणे तयार होते . 
सर्व साधारणपणे घराणे निर्माण करणाऱ्या आद्य कलाकाराच्या वास्तव्यांच्या ठिकाणांची नावे त्या त्या घराण्यांना देण्यात आली आहेत. 
उदा. पखवाज मधील घराणी 
१) जावली घराणे 
२) कुदऊ सिंग घराणे 
३) नाना पानसे घराणे 
४) मंगळ वेढेकर घराणे 
५) पंजाब घराणे 
६) ग्वाल्हेर घराणे 
अशी निरनिराळी विस्थान घराणी आहेत पैकी जावळी घराणे हे सर्वात प्राचीन घराणे मानले जाते . तर नाना पानसे हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय घराणे आहे . 


                                                                                               संदर्भ-  निनाद                                                                                                                                          ( नीळकंठ नारायण राजे)

तबला-पारिभाषिक शब्द आणि व्याख्या

                                                         तबला
                             पारिभाषिक शब्द आणि व्याख्या        

               


१) मात्रा : मात्रेच्या काही व्याख्या खालीलप्रमाणे सांगता येतील . 
अ) ताल मोजण्याच्या परिमाणाला मात्रा म्हणतात . 
ब) एक वर्ण उच्चारण्यास लागणार कालावधी म्हणजे मात्रा होय . थोडक्यात मात्रा म्हणजे अंश होय . म्हणूनच मात्रा म्हणजे तालाचे सर्वात लहान पूर्णांकी एकक होय . 

२) ताल : या शब्दाची व्युत्पत्ती 'तल' या संस्कृत धातूपासून झालेली आहे . येथे 'करतल' म्हणजेच हाताचा तळवा हा अर्थही अभिप्रेत असून करतलांचा एकमेकांवर आघात म्हणजे ताल होय . पण याहीपेक्षा परिपूर्ण व्याख्या म्हणजे गीत ,वाद्य ,नृत्य ज्यामध्ये स्थिरपणे प्रस्थापित केले जाते तो ताल होय .   

३) सम : तालाच्या आरंभीच्या मात्रेला सम म्हणतात . थोडक्यात सम म्हणजे सुरुवात होय . रूपक सारख्या एखाद्या तालाचा अपवाद सोडल्यास सम म्हणजे तालातील एकूण भरीच्या खंडांपैकी सर्वात जास्त भरीच्या खंडाची सुरुवातीची मात्रा असते . 

४) ताली : तालातील भरीचा ( वजनाचा ) विभाग दर्शविण्यासाठी त्या विभागाच्या सुरुवातीच्या मात्रेला जी क्रिया केली जाते त्याला टाळी ( ताली ) असे म्हणतात . 

५) खाली ( काल ) : सर्वसाधारणपणे तालाच्या एकूण मात्रांपैकी निम्म्या मात्रांच्या पुढील मात्रेस खाली म्हणतात . पण हि व्याख्या सर्व तालांना  लागू होत नाही . खाली हा हिंदी शब्द आहे . याचा अर्थ पोकळ, रिकामे ( रिक्त ) होय . म्हणूनच तालातील वजनरहित ( रिक्त ) खंडाच्या सुरुवातीची मात्रा म्हणजे खाली होय . 

६) विभाग : खाली -भारीनुसार तालाचे जे भाग पडतात त्यांना विभाग किंवा खंड म्हणतात . 

७)  दुगुन :  एखाद्या बोलाच्या वा तालाच्या एकपटीच्या एका आवर्तनात त्याच बोल अथवा तालाची २ आवर्तने म्हणणे अथवा वाजविणे म्हणजे दुगुन होय . 

८) आवर्तन : कोणतीही गोष्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदा करणे म्हणजे एक आवर्तन होय . तबल्याच्या भाषेत सांगायचे झाल्यास कोणताही ताल वा बोल समेपासून समेपर्यंत एकदा म्हणणे अथवा वाजविणे म्हणजे आवर्तन होय . 

९) संगीत : गायन , वादन व  नृत्य या तीन कलांना संगीत म्हणतात . 

१०) नाद : दोन वस्तूंच्या एकमेकांवरील आघाताने निर्माण होणार हा केवळ ध्वनी किंव्हा आवाज होय . पण दोन वस्तूंच्या एकमेकांवरील आघातानंतरही स्वतःचे अस्तित्त्व दाखवणारा म्हणजेच आघातानंतरही काही काळ आसेद्वारे श्राव्य अनुभव देणारा ध्वनी म्हणजे नाद होय . 

११) स्वर : नियमित कंपनसंख्येच्या ध्वनीस स्वर म्हणतात. तसेच संगीतोपयोगी नादासही स्वर म्हणतात.  

१२) लय : हा एक संगीतातील महत्वाचा घटक होय . लयीच्या काही व्याख्या पुढीलप्रमाणे -
        अ) वेळेच्या सामान चालीस  लय म्हणतात . 
         ब) दोन क्रियांमधील सामान अंतरास लय म्हणतात . 

१३) बोल : तबल्यावर वाजणाऱ्या विविध वर्णाक्षर तसेच वर्णसमूहांना  बोल म्हणतात . 

१४) ठेका :  तबला -डग्ग्यावर ज्या सुसंगत वर्णसमूहाद्वारे ताल प्रकट होतो त्या वर्णसमूहाला ठेका म्हणतात . 

१५) किस्म : शब्दशः अर्थ प्रकार म्हणजेच ठेक्याचे जे विविध प्रकार असतात त्यांना किस्म म्हणतात . 

१६) कायदा : स्वरव्यंजनांचे योग्य संतुलन असणारी विशेषतः स्वराने सुरु होऊन स्वरानेच संपणारी खाली भारी व खंडयुक्त अशी विस्तारक्षम रचना म्हणजे कायदा होय . 

१७) मुखडा : या शब्दावरूनच त्याचा अर्थ लक्षात येतो . मुखाला म्हणजेच समेला  येऊन मिळण्याकरिता जो छोटासा बोलसमूह वाजविला जातो त्याला मुखडा म्हणतात . विलंबित लयीत साधारणतः शेवटच्या एक किंवा त्याहून कमी मात्रेत तर मध्यलयीत शेवटच्या दोन किंवा चार मात्रेत मुखडा वाजतो . 

१८) तिगुन व चौगुन : एखाद्या बोलाच्या वा तालाच्या एकपटीच्या एका आवर्तनात तोच बोल तीन वेळा वाजविणे अथवा म्हणणे म्हणजे तिगुन व चार वेळा वाजविणे अथवा म्हणणे म्हणजे चौगुन होय . 

१९) तुकडा : बहुतेक सर्व  पूर्व संकल्पित रचनांना तुकडा म्हणतात . प्रामुख्याने तिहाईसहित असणारा व २-३ आवर्तने लांबी असणारा बोलसमूह म्हणजे तुकडा होय. काही विद्वानांच्या मते एखाद्या लंबछड (लांबलचक) बंदिशीचा एखादा छोटासा भाग कि जो स्वतंत्रपणे वाजविला असताही अर्थपूर्ण वाटतो त्याला तुकडा म्हणतात . 

२०) रेला : सुरुवात स्वरांत व शेवट व्यंजनाने होणार , दोन मात्रांमध्ये जास्तीतजास्त अक्षरे असून द्रुत लयीत वाजणारा , नादाची एकसंधसाखळी निर्माण करणारा असा वादनप्रकार की जो कायद्याच्या तुलनेत कमी विस्तारक्षम असतो . 

२१) पलटा : 'पलटना' या हिंदी क्रियापदाच्या अर्थ 'बदलणे' होय . कायदा ,रेला इ. 
विस्तारक्षम रचनांचा विस्तार ज्या माध्यमातून ( ज्याच्या साहाय्याने ) होतो त्याला पलटा म्हणतात . 

२२) लग्गी : दादरा , केहराव सारख्या चंचल तालाच्या ठेक्यांच्या दुगुणीत वाजविल्या जाणाऱ्या विविध प्रकारांना लग्गी अथवा लग्गीनाडा म्हणतात . 

२३) उठान : 'उठना' या हिंदी क्रियापदापासून तयार झालेला शब्द . उठान म्हणजे वादनाचा आरंभ करताना वाजविली जाणारी रचना होय. ही  रचना कथक नृत्यातही सदर केली जाते . बनारस घराण्याचे वादक स्वतंत्र वादनाची सुरुवात उठानने करतात . 

२४) मोहरा : एक आवर्तनापेक्षा कमी लांबीचा , मुखड्याच्या तुलनेत नाजूक बोलांचा , समेवर येणार बोलसमूह म्हणजे मोहरा होय . एखाद्या रचनेतील महत्वाच्या बोलांनाही मोहरा ( प्रमुख ) म्हणण्याची प्रथा आहे . 

२५) पेशकार : तबला वादनातील बहुतेक सर्व बोलांच्या साहाय्याने विविध लय व वजनाच्या आधारे फुलत जाणारा , विचार प्रकटीकरणास  मुभा देणारा व प्रामुख्याने उपजेतून विस्तारत जाणारा खाली भरी  व खंडयुक्त वादनप्रकार म्हणजे पेशकार होय . 

२६) परन : वजनदार , खुल्या बोलांची लांबलचक समूह असलेली विशेषतः तिहाईने संपणारी रचना म्हणजे परन होय . पर्ण ( पान ) या शब्दाचे अपभ्रुतरूप म्हणजे परन होय . ज्याप्रमाणे झाडाच्या पानाला मधोमध एक उभी मुख्य शीर व दोन्ही बाजूने आडव्या उप शीरा असतात त्याप्रमाणे ही  रचना असल्याने याला परन असे म्हणतात . परनचे साथ परन , गत परन , बोल परन व ताल परन असे प्रकार पडतात . परनमध्ये प्रामुख्याने धागेतीट, तागेतीट, क्डधातीट, ताकेतीट इत्यादी बोल प्रामुख्याने आढळतात. 

२७) आमद : आमद  याचा शब्दशः अर्थ आगमन असा होतो . नृत्याच्या आरंभी वाजविल्या जाणाऱ्या बोलरचनेस आमद म्हणतात . काही जाणकारांच्या मते स्वतःच्या समेवर येण्याच्या अंदाजाची व समेची पूर्वकल्पना आपल्या रचनेद्वारे देणारी बंदिश म्हणजे आमद होय . 

२८) तिपल्ली : ति + पल्ली म्हणजे तीन पहलू ( भाग ) होय . अर्थात ज्या रचनेमध्ये लयींचे तीन दर्जे दिसतात तेव्हा त्याला तिपल्ली असे म्हणतात . विद्वानांमध्ये या संदर्भात दोन मते आढळतात . पहिल्या मताप्रमाणे केवळ तीन लयींचा अंतर्भाव असलेली तिपल्ली गत होय . पण दुसऱ्या मताप्रमाणे लयीचे तीन वेगवेगळे दर्जे पण त्या तीनही लयीत 'धा' ने शेवट होणारा एकच बोलसमूह वाजेल . 

२९) चौपल्ली : ज्या रचनेमध्ये लयीचे चार दर्जे अथवा प्रकार असतात त्याला चौपल्ली गत असे म्हणतात . 

३०) गत कायदा : 'गत' या प्रकारात अंतर्भूत असलेल्या जड ( जाड ) बोलांची रचना ज्यावेळी कायद्यासारखी करून कायद्याच्या नियमाला अनुसरून जेव्हा त्याचा विस्तार केला जातो तेव्हा त्या रचनेला गत कायदा म्हणतात . हे रचनाप्रकार लखनौ व फरुखाबाद बजामध्ये आढळतात. हि विस्तारक्षम रचना असली तरीही कायद्याइतका याचा विस्तार होत नाही . कारण यासाठी जे बोल वापरलेले असतात ते 'गती' चे जाड बोल सहजासहजी वरच्या लयीत न जाणारे असतात .      




                                                                 संदर्भ-   सर्वांगीण तबला 
                                                                       श्री.आमोद दंडगे गुरुजी 















पखावज निर्मीती ( इतिहास )

                                                       पखावज निर्मीती  ( इतिहास )

                               नमः शिवाय I  नमः शिवाय  






                     पुरातन काळी भगवान श्री शंकरांनी एक मस्तवाल राक्षसाचा वध केला. त्यामुळे सर्वांना आनंद झाला. स्वतः श्री भगवान शंकर सुद्धा आनंदित होऊन तांडव नृत्य करू लागले . पण ह्या त्यांच्या नृत्याने तिन्ही लोक हादरून गेले ,भयभीत झाले . त्यांनी जर का हे नृत्य थांबवले नाही तर प्रलय होईल अशी सर्वांना भीती वाटू लागली. पण तांडव नृत्य करणाऱ्या भगवान शंकरांना थांबविला कोण ? शेवटी सृष्टी निर्माता ब्रह्मदेव यांनी त्यातून मार्ग काढला . ब्रह्मदेवांनी , भगवान शंकरांनी मारलेल्या त्या भयंकर राक्षसाच्या कातड्यापासून एक ताल वाद्य तयार केले आणि ते वाद्य कलेची  देवता असलेले महाकाय गणराज गणपतीला वाजविण्यास सांगितले . गणपतीने ते वाद्य कौशल्यपूर्ण वाजवून जटाधारी त्या महादेवाचे शंकरांचे नृत्य हळूहळू थांबवले, तेच वाद्य पुढे चालून मृदंग किंव्हा पखवाज म्हणून ओळखले जाऊ लागले . अशी एक अख्यायीका आहे . पखवाज हे फार जुने वाद्य आहे . ते देवांचे वाद्य म्हणून विष्णू वाद्य म्हणून ओळखलं जाते . पखवाज, पख म्हणजे बाहू आणि आवाज म्हणजे वाजविणे , हे बोल वाजविण्यास बाहूंचा उपयोग करावा लागतो तो हा " पखवाज ". 

पखवाजाच्या काही व्याख्या खालीलप्रमाणे ( कुठलेली ठोस विधान करता येणार नाही ) :-

१) पख म्हणजे पर किंव्हा पाकळी , पंजाने वादन करतांना संपूर्ण हाताची हालचाल पक्षांच्या पंखांच्या हालचालीसारखी वाटते म्हणून त्यास पखवाज असे म्हणतात. 
२) कमळावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांचा आवाज ऐकून ह्या वाद्याची कल्पना साकारली गेली म्हणून त्यास पखवाज असे म्हणतात. 
३) पख म्हणजे पंजा , पंजाने वाजविले जाणारे म्हणून पखवाज. 


                                                             मृदंग महिमा 
                                    संगीताचा मूळ गाभा म्हणजेच स्वर ,नाद 
                           पखवाजावरील 'धा' चा निनाद म्हणजेच ब्रह्मनाद होय . 
                        कीर्तनी भजनी मृदंगाची गाथा I  न्हावू घाली पंढरीनाथ सर्वकाळ II
                                   अभंग जेव्हा होतो गोड I  मृदंगाची त्याला असे जोड II
                                जया टाळ मृदंगाची साथ I  नाचतो साक्षात पंढरीनाथ I
                          लावूनी मृदंग श्रुती टाळ घोष  I  सेवू ब्रह्मरस आवडीने I 
                                                                   ....... संत शिरोमणी तुकाराम महाराज 

 मृदंग - मृदंग भारतीय चलशास्त्रानुसार पुराणांमध्ये  उल्लेखलेले वाद्य मातीपासून तयार केलेले असून त्यांच्या दोन्ही बाजूंना चामडे मढविलेले असे. मातीपासून बनवलले म्हणून त्यास  मृदंग ( मृदु + अंग ) असे म्हटले जाते . 

                                              
                                                                                     संदर्भ-  निनाद                                                                                                                                          ( नीळकंठ नारायण राजे )
            

तबला- ताल वाद्य

                                तबला- ताल वाद्य ( इतिहास )


                 तबला या वाद्याच्या उगमसंदर्भात आजपर्यंत कित्येक विद्वान व बुजुर्ग मंडळींनी खूप संशोधन केले आहे. पण आजपर्यंत तबल्याच्या उगमासंदर्भात निश्चित खात्रीलायक व ठोस माहिती कोठेही मिळत नाही. पंडित अरविंद मुळगांवकर , डॉ. आबान मिस्त्री अशा अनेक श्रेष्ठ विचारवंतांनी यासंदर्भात खूप मोलाचे संशोधन करुन तबल्याच्या निर्मितीसंदर्भात बऱ्याच शक्यता अथवा विचारप्रवाह आपापल्या ग्रंथात व्यक्त केले आहेत. तरीही तबल्याचे जनकत्व व त्याच्या उगमाचा निश्चित कालावधी याविषयी माहिती  मिळत नाही. 
               तबल्याच्या निर्मितीसंदर्भात 'टुटा तब भी बोला' सारख्या मनोरंजक तर्काला कोठेही न पटणाऱ्या कथाही अस्तित्वात आहेत. तबला हे वाद्य विविध संस्कृती, प्रांतातून प्रवास करत भारतात आल्याचे दाखले तसेच भारतात खूप प्राचीन कालापासून तबला किंव्हा तबला सदृश्य दिसणाऱ्या वाद्द्यांचे दाखले विद्वानांनी दिले आहेत. त्यामुळे  तबल्याच्या निर्मितीचा मान कोणास द्यावयाचा व त्याचा कालावधी कसा निश्चित करावयाचा हे दोन गहन प्रश्न आजही समोर उभे आहेत. 
              विविध विचारवंतांनी तबल्याच्या उत्पत्तीसंदर्भात जे विविध प्रकार प्रकट केले आहेत ते पुढीलप्रमाणे -
१) अमीर खुसरो यांनी तबल्याची निर्मिती केली आहे असे काही जण मानतात पण पं.अरविंद मुळगांवकर यांच्या ग्रंथात असा उल्लेख आढळतो की , केवळ नामसाधर्म्यामुळे तबल्याचे जनकत्व खुसरो खाँ यांच्याऐवजी अमीर खुसरो  यांच्याकडे आले. 
२) काहींच्या मते तबल्याचा उगम १२१०च्या आसपास झाला असण्याची शक्यता वर्तविली जाते. पण महत्वाची गोष्ट म्हणजे सतराव्या शतकापर्यंत लिहिल्या गेलेल्या ग्रंथामध्ये तबला वाद्याचा उल्लेख आढळत नाही. 
३)डॉ. आबान मिस्त्री यांनी कार्ला (लोणावळा , महाराष्ट्र) येथील प्राचीन गुंफेत असलेल्या शिल्पामध्ये एक स्त्री तबल्यासारखे दोन भाग असलेले वाद्य वाजवीत असल्याचे आपल्या ग्रंथात नमूद केले आहे. 
४) तबला मेसोपोटेमियन , सीरियन ,अरेबियन अशा तीन संस्कृतींमधून अनुक्रमे अवतरत मोगलांकरवी भारतात आला असावा.
५) अमीर खुसरोंच्या जन्मापूर्वी शेकडो वर्षे तबला भारतात होता व तबला हे नि;संशय भारतीय वाद्य आहे. 
६)काहींच्या मते , तबला हे वाद्य उर्ध्वक व आलिंग्य या त्रिपुष्कर वाद्याच्या दोन भागापासून बनले असावे. अर्थात , यवन काळात त्याच्यात काही परिवर्तन होऊन ते तबला या नावाने प्रसिद्ध झाले असावे. 
७)महाराष्ट्रातील संबळ या वाद्याची बनावट बरीचशी तबल्यासारखी असल्याने काहींच्या मते , तबला हे  संबळ या वाद्याचेच एक सुधारित रूप आहे. 
८)पंजाब प्रांतात पूर्वी आढळणारे 'दुक्कड' हे वाद्य आजच्या तबल्याचे जनक असल्याची काहीजण शक्यता वर्तवितात. 
९) 'संगीत तबला अंक' या ग्रंथातील एक लेखामध्ये श्रीमती योगमाया शुक्ला यांनी विविध कालखंडात लिहिलेल्या विविध ग्रंथात तबला या वाद्याचा उल्लेख आढळल्याचे दाखले दिले आहेत. ते पुढीलप्रमाणे -
अ)जैन आचार्य सुधाकलश ' वाचनाचार्य ' यांच्या सन  १३५० मध्ये लिहिलेल्या             'संगीतोपनिष् तसारोद्वार' या ग्रंथात पुढीलप्रमाणे तबल्याचा उल्लेख केला आहे.                                    तथैव म्लेंच्छवाद्यानी ढोल तब्लमुखानि तू  I 
        डफ च टामकी चैव डउंडी पादचारीणाम I 
 म्हणजेच ढोल, तबला ,ढफ , डउंडी (डौंडी)हि सर्व म्लेेच्छ( मुस्लीम ) वाद्यें होत.

बी) आसाममधील वैष्णव संत माधव कंदली यांच्या आसामी भाषेतील रामायणामध्येही तबल्याच्या पुढीलप्रमाणे उल्लेख आढळतो. 
   '' बिरढाक ढोल बाजिया तबर डगर सबद सुनिया "

क) पंधराव्या शतकात शिखांचे प्रथम गुरु गुरुनानक देव यांनी एका 
पदामध्ये तबला वाद्याचा पुढीलप्रमाणे उल्लेख केला आहे. 
       " तबला बाज बीचार सबदि सुणाइया I"
१०) 'संगीत तबला अंक' या ग्रंथातील दुसऱ्या एक लेखात डॉ. आबान मिस्त्री त्यांनी सहाव्या शतकातील बदामी येथील एक शिल्पाचा उल्लेख केला आहे. की ,ज्यामध्ये तबला डग्ग्यासारखे वाद्य एक व्यक्ती वाजवीत आहे. 
 वरील सर्व दाखले पाहिले असता हे लक्षात येते की , तबला किंव्हा तबलासदृश्य वाद्याचे विविध कालखंडात विविध ठिकाणी उल्लेख आढळतात. तसेच या सर्व विचारप्रवाहात कमालीची भिन्नता आढळते. या सर्व विचारप्रवाहावरून आपण दोन तर्क काढू शकतो, ते म्हणजे १) तबला हे वाद्य मूळचे मुस्लिम राष्ट्रातील असून विविध ठिकाणच्या प्रवासानंतर ते भारतात आले असावे. २)भारतातील प्राचीन कालखंडातील विविध ठिकाणची विविध वाद्ये ,की जी तबला सदृश्य होती तीच आजच्या तबला वाद्याची जनक आहेत. त्यामुळे तबला हे वाद्य पूर्णतः भारतीय वाद्य आहे. 
           अर्थात एक गोष्ट मात्र निर्विवाद आहे की ,आजचा तबला व त्याचे रूप , वाजविण्याची पद्धत हि कित्येक पिढ्यांनी केलेल्या मेहनतीचे फळ आहे. 
                                            
                                                          संदर्भ-   सर्वांगीण तबला 
                                                                       श्री.आमोद दंडगे गुरुजी    

संगीताचा इतिहास

                       संगीताचा इतिहास-सामवेद 



 

सामवेद हा प्राचीन हिंदू संस्कृतीतील चार वेदांपैकी तिसऱ्या क्रमांकाचा वेद आहे. साम म्हणजे 'गायन' आणि वेद म्हणजे 'ज्ञान' होय.हा वेद ब्रह्मदेवाने लिहिला आहे असे मानले जाते.      

                                                                                                                                           

                                             निर्माण

                                            

ब्रह्मदेव निद्रेत असताना त्यांच्या तोंडातून तीन वेद निघाले.त्यांच्यापैकी एक म्हणजे सामवेद.                                                     

                                           साम शब्दाचा अर्थ 

               साम शब्दाचा पहिला अर्थ प्रिय किंवा प्रियकर वचन असा आहे. कुठे कुठे गान या अर्थानेही तो प्रयुक्त आहे. प्रचलित सामवेदाला हाच अर्थ लागू पडतो. सा च अमश्चेति तत्     साम्न: सामत्वम्‌। (बृहदारण्यक उपनिषद १.३.२२) सा म्हणजे ऋचा आणि अम् म्हणजे  गांधारादी स्वर होत. दोन्ही मिळून साम होते.



                                                      स्वरूप 

          सामवेदात ॠग्वेदातील ॠचांचे गायन कसे करावे याचे विवेचन आहे.सामवेदाला भारतीय संगीताचा पाया म्हटले जाते.यातील ७५ ऋचा ऋग्वेदाच्या शाकल शाखेतून घेतल्या, तर इतर ७५ या बाष्कल शाखेमध्ये मोडतात. या ऋचांचे गायन-सामगान हे सुचवलेल्या विशिष्ट सुरांमध्ये गायले जाते. सामगान गाऊन विशिष्ट विधी करतांना विविध देवतांना प्रसाद पेयार्पण म्हणून दूध व इतर पदार्थाबरोबर सोम वनस्पतीचा रस अर्पिला जाई.
सामवेदातील काही ऋचा या इ.स.पू. १७०० च्या आधी (ऋग्वेदाच्या कालखंडात) रचल्या असल्या पाहिजेत असे मानले जाते. भगवद्गीतेत श्रीकृष्णाने वेदानां अहम् सामवेदोस्मि असे म्हटले आहे, हा सामवेदाचा गौरवच आहे. कौथुम आणि राणायनीय, जैमिनीय या सामवेदाच्या शाखा मानल्या जातात. ताण्ड्य/पञ्चविंश, षड्विंश, साम विधान, आर्षेय, देवताध्याय, उपनिषद् आणि वंश ही सामवेदाची ब्राह्मणे आहेत.



                                                      गंधर्ववेद 

     गंधर्ववेद हा सामवेदाचा उपवेद आहे.




                                      सामवेद आणि यज्ञसंस्था

       वेदा हि यज्ञार्थ अभिप्रवृत्ता:| वेद हे यज्ञासाठीच प्रवृत्त झाले आहेत अशी वैदिकांची धारणा आहे. यज्ञातील वेगवेगळी कर्मे करणारे ऋत्विज वेगवेगळे असतात. त्यांना विशिष्ट नावे असतात. देवतांना संतुष्ट करण्यासाठी ऋचांचे गायन करण्याचे काम सामवेद्यांचे असते. ते करणाऱ्या चार ऋत्विजांचा एक गट असतो.त्यांच्या प्रमुखाला उद्गाता म्हणतात. एखादे साम तयार झाले की त्याच्या गायनाचे पाच अवयव तयार होतात, ते असे :-१. प्रस्ताव२. उद्गीथ३. प्रतिहार४.उपद्रव५. निधन
सामगान करताना त्यातील ऋचांची आवृत्ती केली जाते त्याला स्तोम असे म्हणतात. साम हे प्राय: तीन ऋचांवर गायले जाते आणि त्याचे तीन पर्याय म्हणजे तीन आवृत्त्या करतात.



                                           सामगानाचे स्वरूप

      सामगानात पदांच्या १ ते ७ अंकांनी संगीताच्या सात स्वरांचा निर्देश केला जातो. प्राय: अधिकांश मंत्रांमध्ये पाचच स्वर लागतात. सहा स्वरांनी गायिली जाणारी सामे थोडी आहेत आणि सात स्वरांची त्याहून थोडी आहेत.



                                                साममंत्र

    यात तेरा प्रपाठक असून, सामगायनाचा विधी, त्याचे संकेत आणि त्याच्या पद्धती यांचे हे वर्णन आहे. हे एका प्रकारचे सामवेदाचे व्याकरणच आहे. 


                                                                                                                    संदर्भ -  wikipedia