Translate

तबला-पारिभाषिक शब्द आणि व्याख्या

                                                         तबला
                             पारिभाषिक शब्द आणि व्याख्या        

               


१) मात्रा : मात्रेच्या काही व्याख्या खालीलप्रमाणे सांगता येतील . 
अ) ताल मोजण्याच्या परिमाणाला मात्रा म्हणतात . 
ब) एक वर्ण उच्चारण्यास लागणार कालावधी म्हणजे मात्रा होय . थोडक्यात मात्रा म्हणजे अंश होय . म्हणूनच मात्रा म्हणजे तालाचे सर्वात लहान पूर्णांकी एकक होय . 

२) ताल : या शब्दाची व्युत्पत्ती 'तल' या संस्कृत धातूपासून झालेली आहे . येथे 'करतल' म्हणजेच हाताचा तळवा हा अर्थही अभिप्रेत असून करतलांचा एकमेकांवर आघात म्हणजे ताल होय . पण याहीपेक्षा परिपूर्ण व्याख्या म्हणजे गीत ,वाद्य ,नृत्य ज्यामध्ये स्थिरपणे प्रस्थापित केले जाते तो ताल होय .   

३) सम : तालाच्या आरंभीच्या मात्रेला सम म्हणतात . थोडक्यात सम म्हणजे सुरुवात होय . रूपक सारख्या एखाद्या तालाचा अपवाद सोडल्यास सम म्हणजे तालातील एकूण भरीच्या खंडांपैकी सर्वात जास्त भरीच्या खंडाची सुरुवातीची मात्रा असते . 

४) ताली : तालातील भरीचा ( वजनाचा ) विभाग दर्शविण्यासाठी त्या विभागाच्या सुरुवातीच्या मात्रेला जी क्रिया केली जाते त्याला टाळी ( ताली ) असे म्हणतात . 

५) खाली ( काल ) : सर्वसाधारणपणे तालाच्या एकूण मात्रांपैकी निम्म्या मात्रांच्या पुढील मात्रेस खाली म्हणतात . पण हि व्याख्या सर्व तालांना  लागू होत नाही . खाली हा हिंदी शब्द आहे . याचा अर्थ पोकळ, रिकामे ( रिक्त ) होय . म्हणूनच तालातील वजनरहित ( रिक्त ) खंडाच्या सुरुवातीची मात्रा म्हणजे खाली होय . 

६) विभाग : खाली -भारीनुसार तालाचे जे भाग पडतात त्यांना विभाग किंवा खंड म्हणतात . 

७)  दुगुन :  एखाद्या बोलाच्या वा तालाच्या एकपटीच्या एका आवर्तनात त्याच बोल अथवा तालाची २ आवर्तने म्हणणे अथवा वाजविणे म्हणजे दुगुन होय . 

८) आवर्तन : कोणतीही गोष्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदा करणे म्हणजे एक आवर्तन होय . तबल्याच्या भाषेत सांगायचे झाल्यास कोणताही ताल वा बोल समेपासून समेपर्यंत एकदा म्हणणे अथवा वाजविणे म्हणजे आवर्तन होय . 

९) संगीत : गायन , वादन व  नृत्य या तीन कलांना संगीत म्हणतात . 

१०) नाद : दोन वस्तूंच्या एकमेकांवरील आघाताने निर्माण होणार हा केवळ ध्वनी किंव्हा आवाज होय . पण दोन वस्तूंच्या एकमेकांवरील आघातानंतरही स्वतःचे अस्तित्त्व दाखवणारा म्हणजेच आघातानंतरही काही काळ आसेद्वारे श्राव्य अनुभव देणारा ध्वनी म्हणजे नाद होय . 

११) स्वर : नियमित कंपनसंख्येच्या ध्वनीस स्वर म्हणतात. तसेच संगीतोपयोगी नादासही स्वर म्हणतात.  

१२) लय : हा एक संगीतातील महत्वाचा घटक होय . लयीच्या काही व्याख्या पुढीलप्रमाणे -
        अ) वेळेच्या सामान चालीस  लय म्हणतात . 
         ब) दोन क्रियांमधील सामान अंतरास लय म्हणतात . 

१३) बोल : तबल्यावर वाजणाऱ्या विविध वर्णाक्षर तसेच वर्णसमूहांना  बोल म्हणतात . 

१४) ठेका :  तबला -डग्ग्यावर ज्या सुसंगत वर्णसमूहाद्वारे ताल प्रकट होतो त्या वर्णसमूहाला ठेका म्हणतात . 

१५) किस्म : शब्दशः अर्थ प्रकार म्हणजेच ठेक्याचे जे विविध प्रकार असतात त्यांना किस्म म्हणतात . 

१६) कायदा : स्वरव्यंजनांचे योग्य संतुलन असणारी विशेषतः स्वराने सुरु होऊन स्वरानेच संपणारी खाली भारी व खंडयुक्त अशी विस्तारक्षम रचना म्हणजे कायदा होय . 

१७) मुखडा : या शब्दावरूनच त्याचा अर्थ लक्षात येतो . मुखाला म्हणजेच समेला  येऊन मिळण्याकरिता जो छोटासा बोलसमूह वाजविला जातो त्याला मुखडा म्हणतात . विलंबित लयीत साधारणतः शेवटच्या एक किंवा त्याहून कमी मात्रेत तर मध्यलयीत शेवटच्या दोन किंवा चार मात्रेत मुखडा वाजतो . 

१८) तिगुन व चौगुन : एखाद्या बोलाच्या वा तालाच्या एकपटीच्या एका आवर्तनात तोच बोल तीन वेळा वाजविणे अथवा म्हणणे म्हणजे तिगुन व चार वेळा वाजविणे अथवा म्हणणे म्हणजे चौगुन होय . 

१९) तुकडा : बहुतेक सर्व  पूर्व संकल्पित रचनांना तुकडा म्हणतात . प्रामुख्याने तिहाईसहित असणारा व २-३ आवर्तने लांबी असणारा बोलसमूह म्हणजे तुकडा होय. काही विद्वानांच्या मते एखाद्या लंबछड (लांबलचक) बंदिशीचा एखादा छोटासा भाग कि जो स्वतंत्रपणे वाजविला असताही अर्थपूर्ण वाटतो त्याला तुकडा म्हणतात . 

२०) रेला : सुरुवात स्वरांत व शेवट व्यंजनाने होणार , दोन मात्रांमध्ये जास्तीतजास्त अक्षरे असून द्रुत लयीत वाजणारा , नादाची एकसंधसाखळी निर्माण करणारा असा वादनप्रकार की जो कायद्याच्या तुलनेत कमी विस्तारक्षम असतो . 

२१) पलटा : 'पलटना' या हिंदी क्रियापदाच्या अर्थ 'बदलणे' होय . कायदा ,रेला इ. 
विस्तारक्षम रचनांचा विस्तार ज्या माध्यमातून ( ज्याच्या साहाय्याने ) होतो त्याला पलटा म्हणतात . 

२२) लग्गी : दादरा , केहराव सारख्या चंचल तालाच्या ठेक्यांच्या दुगुणीत वाजविल्या जाणाऱ्या विविध प्रकारांना लग्गी अथवा लग्गीनाडा म्हणतात . 

२३) उठान : 'उठना' या हिंदी क्रियापदापासून तयार झालेला शब्द . उठान म्हणजे वादनाचा आरंभ करताना वाजविली जाणारी रचना होय. ही  रचना कथक नृत्यातही सदर केली जाते . बनारस घराण्याचे वादक स्वतंत्र वादनाची सुरुवात उठानने करतात . 

२४) मोहरा : एक आवर्तनापेक्षा कमी लांबीचा , मुखड्याच्या तुलनेत नाजूक बोलांचा , समेवर येणार बोलसमूह म्हणजे मोहरा होय . एखाद्या रचनेतील महत्वाच्या बोलांनाही मोहरा ( प्रमुख ) म्हणण्याची प्रथा आहे . 

२५) पेशकार : तबला वादनातील बहुतेक सर्व बोलांच्या साहाय्याने विविध लय व वजनाच्या आधारे फुलत जाणारा , विचार प्रकटीकरणास  मुभा देणारा व प्रामुख्याने उपजेतून विस्तारत जाणारा खाली भरी  व खंडयुक्त वादनप्रकार म्हणजे पेशकार होय . 

२६) परन : वजनदार , खुल्या बोलांची लांबलचक समूह असलेली विशेषतः तिहाईने संपणारी रचना म्हणजे परन होय . पर्ण ( पान ) या शब्दाचे अपभ्रुतरूप म्हणजे परन होय . ज्याप्रमाणे झाडाच्या पानाला मधोमध एक उभी मुख्य शीर व दोन्ही बाजूने आडव्या उप शीरा असतात त्याप्रमाणे ही  रचना असल्याने याला परन असे म्हणतात . परनचे साथ परन , गत परन , बोल परन व ताल परन असे प्रकार पडतात . परनमध्ये प्रामुख्याने धागेतीट, तागेतीट, क्डधातीट, ताकेतीट इत्यादी बोल प्रामुख्याने आढळतात. 

२७) आमद : आमद  याचा शब्दशः अर्थ आगमन असा होतो . नृत्याच्या आरंभी वाजविल्या जाणाऱ्या बोलरचनेस आमद म्हणतात . काही जाणकारांच्या मते स्वतःच्या समेवर येण्याच्या अंदाजाची व समेची पूर्वकल्पना आपल्या रचनेद्वारे देणारी बंदिश म्हणजे आमद होय . 

२८) तिपल्ली : ति + पल्ली म्हणजे तीन पहलू ( भाग ) होय . अर्थात ज्या रचनेमध्ये लयींचे तीन दर्जे दिसतात तेव्हा त्याला तिपल्ली असे म्हणतात . विद्वानांमध्ये या संदर्भात दोन मते आढळतात . पहिल्या मताप्रमाणे केवळ तीन लयींचा अंतर्भाव असलेली तिपल्ली गत होय . पण दुसऱ्या मताप्रमाणे लयीचे तीन वेगवेगळे दर्जे पण त्या तीनही लयीत 'धा' ने शेवट होणारा एकच बोलसमूह वाजेल . 

२९) चौपल्ली : ज्या रचनेमध्ये लयीचे चार दर्जे अथवा प्रकार असतात त्याला चौपल्ली गत असे म्हणतात . 

३०) गत कायदा : 'गत' या प्रकारात अंतर्भूत असलेल्या जड ( जाड ) बोलांची रचना ज्यावेळी कायद्यासारखी करून कायद्याच्या नियमाला अनुसरून जेव्हा त्याचा विस्तार केला जातो तेव्हा त्या रचनेला गत कायदा म्हणतात . हे रचनाप्रकार लखनौ व फरुखाबाद बजामध्ये आढळतात. हि विस्तारक्षम रचना असली तरीही कायद्याइतका याचा विस्तार होत नाही . कारण यासाठी जे बोल वापरलेले असतात ते 'गती' चे जाड बोल सहजासहजी वरच्या लयीत न जाणारे असतात .      




                                                                 संदर्भ-   सर्वांगीण तबला 
                                                                       श्री.आमोद दंडगे गुरुजी 















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा