Translate

तबला- ताल वाद्य

                                तबला- ताल वाद्य ( इतिहास )


                 तबला या वाद्याच्या उगमसंदर्भात आजपर्यंत कित्येक विद्वान व बुजुर्ग मंडळींनी खूप संशोधन केले आहे. पण आजपर्यंत तबल्याच्या उगमासंदर्भात निश्चित खात्रीलायक व ठोस माहिती कोठेही मिळत नाही. पंडित अरविंद मुळगांवकर , डॉ. आबान मिस्त्री अशा अनेक श्रेष्ठ विचारवंतांनी यासंदर्भात खूप मोलाचे संशोधन करुन तबल्याच्या निर्मितीसंदर्भात बऱ्याच शक्यता अथवा विचारप्रवाह आपापल्या ग्रंथात व्यक्त केले आहेत. तरीही तबल्याचे जनकत्व व त्याच्या उगमाचा निश्चित कालावधी याविषयी माहिती  मिळत नाही. 
               तबल्याच्या निर्मितीसंदर्भात 'टुटा तब भी बोला' सारख्या मनोरंजक तर्काला कोठेही न पटणाऱ्या कथाही अस्तित्वात आहेत. तबला हे वाद्य विविध संस्कृती, प्रांतातून प्रवास करत भारतात आल्याचे दाखले तसेच भारतात खूप प्राचीन कालापासून तबला किंव्हा तबला सदृश्य दिसणाऱ्या वाद्द्यांचे दाखले विद्वानांनी दिले आहेत. त्यामुळे  तबल्याच्या निर्मितीचा मान कोणास द्यावयाचा व त्याचा कालावधी कसा निश्चित करावयाचा हे दोन गहन प्रश्न आजही समोर उभे आहेत. 
              विविध विचारवंतांनी तबल्याच्या उत्पत्तीसंदर्भात जे विविध प्रकार प्रकट केले आहेत ते पुढीलप्रमाणे -
१) अमीर खुसरो यांनी तबल्याची निर्मिती केली आहे असे काही जण मानतात पण पं.अरविंद मुळगांवकर यांच्या ग्रंथात असा उल्लेख आढळतो की , केवळ नामसाधर्म्यामुळे तबल्याचे जनकत्व खुसरो खाँ यांच्याऐवजी अमीर खुसरो  यांच्याकडे आले. 
२) काहींच्या मते तबल्याचा उगम १२१०च्या आसपास झाला असण्याची शक्यता वर्तविली जाते. पण महत्वाची गोष्ट म्हणजे सतराव्या शतकापर्यंत लिहिल्या गेलेल्या ग्रंथामध्ये तबला वाद्याचा उल्लेख आढळत नाही. 
३)डॉ. आबान मिस्त्री यांनी कार्ला (लोणावळा , महाराष्ट्र) येथील प्राचीन गुंफेत असलेल्या शिल्पामध्ये एक स्त्री तबल्यासारखे दोन भाग असलेले वाद्य वाजवीत असल्याचे आपल्या ग्रंथात नमूद केले आहे. 
४) तबला मेसोपोटेमियन , सीरियन ,अरेबियन अशा तीन संस्कृतींमधून अनुक्रमे अवतरत मोगलांकरवी भारतात आला असावा.
५) अमीर खुसरोंच्या जन्मापूर्वी शेकडो वर्षे तबला भारतात होता व तबला हे नि;संशय भारतीय वाद्य आहे. 
६)काहींच्या मते , तबला हे वाद्य उर्ध्वक व आलिंग्य या त्रिपुष्कर वाद्याच्या दोन भागापासून बनले असावे. अर्थात , यवन काळात त्याच्यात काही परिवर्तन होऊन ते तबला या नावाने प्रसिद्ध झाले असावे. 
७)महाराष्ट्रातील संबळ या वाद्याची बनावट बरीचशी तबल्यासारखी असल्याने काहींच्या मते , तबला हे  संबळ या वाद्याचेच एक सुधारित रूप आहे. 
८)पंजाब प्रांतात पूर्वी आढळणारे 'दुक्कड' हे वाद्य आजच्या तबल्याचे जनक असल्याची काहीजण शक्यता वर्तवितात. 
९) 'संगीत तबला अंक' या ग्रंथातील एक लेखामध्ये श्रीमती योगमाया शुक्ला यांनी विविध कालखंडात लिहिलेल्या विविध ग्रंथात तबला या वाद्याचा उल्लेख आढळल्याचे दाखले दिले आहेत. ते पुढीलप्रमाणे -
अ)जैन आचार्य सुधाकलश ' वाचनाचार्य ' यांच्या सन  १३५० मध्ये लिहिलेल्या             'संगीतोपनिष् तसारोद्वार' या ग्रंथात पुढीलप्रमाणे तबल्याचा उल्लेख केला आहे.                                    तथैव म्लेंच्छवाद्यानी ढोल तब्लमुखानि तू  I 
        डफ च टामकी चैव डउंडी पादचारीणाम I 
 म्हणजेच ढोल, तबला ,ढफ , डउंडी (डौंडी)हि सर्व म्लेेच्छ( मुस्लीम ) वाद्यें होत.

बी) आसाममधील वैष्णव संत माधव कंदली यांच्या आसामी भाषेतील रामायणामध्येही तबल्याच्या पुढीलप्रमाणे उल्लेख आढळतो. 
   '' बिरढाक ढोल बाजिया तबर डगर सबद सुनिया "

क) पंधराव्या शतकात शिखांचे प्रथम गुरु गुरुनानक देव यांनी एका 
पदामध्ये तबला वाद्याचा पुढीलप्रमाणे उल्लेख केला आहे. 
       " तबला बाज बीचार सबदि सुणाइया I"
१०) 'संगीत तबला अंक' या ग्रंथातील दुसऱ्या एक लेखात डॉ. आबान मिस्त्री त्यांनी सहाव्या शतकातील बदामी येथील एक शिल्पाचा उल्लेख केला आहे. की ,ज्यामध्ये तबला डग्ग्यासारखे वाद्य एक व्यक्ती वाजवीत आहे. 
 वरील सर्व दाखले पाहिले असता हे लक्षात येते की , तबला किंव्हा तबलासदृश्य वाद्याचे विविध कालखंडात विविध ठिकाणी उल्लेख आढळतात. तसेच या सर्व विचारप्रवाहात कमालीची भिन्नता आढळते. या सर्व विचारप्रवाहावरून आपण दोन तर्क काढू शकतो, ते म्हणजे १) तबला हे वाद्य मूळचे मुस्लिम राष्ट्रातील असून विविध ठिकाणच्या प्रवासानंतर ते भारतात आले असावे. २)भारतातील प्राचीन कालखंडातील विविध ठिकाणची विविध वाद्ये ,की जी तबला सदृश्य होती तीच आजच्या तबला वाद्याची जनक आहेत. त्यामुळे तबला हे वाद्य पूर्णतः भारतीय वाद्य आहे. 
           अर्थात एक गोष्ट मात्र निर्विवाद आहे की ,आजचा तबला व त्याचे रूप , वाजविण्याची पद्धत हि कित्येक पिढ्यांनी केलेल्या मेहनतीचे फळ आहे. 
                                            
                                                          संदर्भ-   सर्वांगीण तबला 
                                                                       श्री.आमोद दंडगे गुरुजी    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा